मुंबई : मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे राज्य सरकारकडून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. आज (२३ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांकडून एकमुखाने हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत देत, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
३० जिल्ह्यांत ७० लाख एकरांहून अधिक नुकसान
राज्यातील ३० जिल्ह्यांत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, एकूण ७० लाख एकरांहून अधिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड, यवतमाळ, जालना, परभणी, बीड, चंद्रपूरसह मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत झाले आहे. सोयाबीन, कापूस, धान आणि इतर खरीप पिके पाण्यात बुडाली, तर गुरे वाहून गेली, रस्ते-पाणंदी उद्ध्वस्त झाली.
कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले, “हे निसर्गाचे संकट आहे, धीराने सामना करावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे, अजित पवार) परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. जनावरे गमावलेल्यांना विशेष मदत केली जाईल.”
“राज्य किंवा केंद्राची मदत ठरली आहे. काही काळ रक्कम वाढवली होती. पंचनामे वेगाने करा, तातडीने भरपाई द्या. शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला जाईल.” त्यांनी नमूद केले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून, जनावरांच्या नुकसानीसाठी विशेष तरतूद असेल, असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री सक्रिय आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान, शेती, घरांची पडझड. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ओला दुष्काळाबाबत विचारविनिमय होईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.


