Pune News : पुण्यातील खांदवेनगर परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर भाजलेल्या आई-वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटीमधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या गित्ते कुटुंबाच्या घरात हा स्फोट झाला. स्वयंपाकघरात रिकामा झालेला गॅस सिलिंडर बदलून नवीन सिलिंडर जोडत असताना नोझलमधून गॅस गळती सुरू झाली. त्याचवेळी घरातील देवघरात दिवा सुरू असल्याने गॅसने पेट घेतला आणि काही क्षणांतच भीषण स्फोट झाला.
या स्फोटात पांडुरंग गित्ते यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील विष्णू गित्ते आणि आई वृंदाविनी गित्ते हे गंभीर भाजल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पांडुरंग यांची पत्नी राजश्री गित्ते आणि पाच वर्षांची मुलगी निहारिका या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाल्या.
घटनेवेळी राजश्री गित्ते या स्नानगृहात असल्याने त्यांचा जीव वाचला. तर बाल्कनीत अडकलेल्या निहारिकाला स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत खाली उडी मारण्यास सांगितले. नागरिकांनी तिला सुरक्षित झेलल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीत घरातील हॉल, किचन आणि बेडरूममधील साहित्य जळून खाक झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले आहे.
गित्ते कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील नंदागवळ गावचे असून या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.


