पुणे : आस्थापनेवरील ५८ लिपिक टंकलेखक कर्मचाऱ्यांना जातवैधता सादर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून शेवटची सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम २००० चे परिपत्रक पुणे महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे.
पुणे महानगरपालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सर्व मागासवर्गीय (अजा, अज, चिमुक्त जाती, भटक्या जमाती, विमान व इमाव) गटातून नेमणूक करण्यात आलेल्या कामगारांना सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र अजूनही ५८ कामगारांनी हे प्रमाणपत्र सादर केले नाही. गुरूवार (दि. १९) पासून सात दिवसाच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


