पुणे : भारतीय युवक काँग्रेसने बेरोजगारीच्या संकटाला वाचा फोडण्यासाठी आणि तरुणांचा आवाज उचलण्यासाठी ‘यंग इंडिया के बोल’ या मोहिमेची घोषणा केली आहे. ही मोहीम भारतीय पातळीवर सुरू असून, पुणे शहरात ही राबविण्यात येत आहे. ही मोहीम १८ ते ३५ वयोगट युवकांसाठी आहे, अशी माहिती पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे आणि युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सहप्रभारी एहसान खान यांनी दिली. या पत्रकार परिषदेस पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, युवक काँग्रेस महाराष्ट्र सह प्रभारी एहसान खान, अक्षय जैन, हर्षल हांडे, ऋत्विक घनवट, आनंद दुबे, कुणाल काळे, तुषार पठारे उपस्थित होते.
सौरभ अमराळे म्हणाले, देशातील बेरोजगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात भारताचा बेरोजगारी दर ४५ वर्षांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला असून, शहरी तरुणांमध्ये हा दर १६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दर वर्षी १.२ कोटी तरुण रोजगाराच्या शोधात असतात, पण अर्थव्यवस्थेत फक्त निम्म्यालाच नोकऱ्या मिळतात. सरकारने २०१४ मध्ये दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, पण आज तरुणांकडे रोजगारपत्रांऐवजी व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स आहेत. ‘यंग इंडिया के बोल’ या मोहिमेद्वारे तरुणांना सक्षम करणे आणि सरकारला जबाबदारीसाठी प्रवृत्त करणे हा आमचा उद्देश आहे. युवक काँग्रेस तरुणांच्या पाठीशी ठाम उभी असून रोजगार आणि सन्मानासाठी संघर्ष करणार आहे, असेही अमराळे म्हणाले.


