पुणे: प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) विकास परवानगी विभागातील कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. यात अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे काही कामकाज सोपविण्याचा निर्णय आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला आहे. तसेच तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
पीएमआरडीएमधील विकास परवानगी विभागात जे काही प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी सादर होत होते, त्यापैकी काही अधिकार त्यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे हस्तांतरित केले आहेत. कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित निर्णय घेण्यात आला असून पुढील नमुद प्रस्ताव सहायक महानगर नियोजनकार, रचना सहायक यांनी सह/उप महानगर नियोजनकार यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावे लागणार आहे.
अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे एक एकरापर्यंतचे भूखंड क्षेत्र असलेले सर्व प्रस्ताव, तसेच सर्व वनघर, शेतघर व पेट्रोल पंपाचे प्रस्ताव, सर्व गुंठेवारी प्रकरणे, वास्तुविशारद/अभियंता नोंदणी प्रकरणे, आकाश चिन्ह परवान्याचे प्रस्ताव, वृक्ष प्राधिकरणाशी संबंधित सर्व प्रस्ताव या प्रस्तावांच्या अनुषंगाने सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या कामकाजाचा समावेश करण्यात आला आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे संबंधित कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे.
संबंधित कामकाजाव्यतिरिक्त इतर सर्व कामकाज आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी येणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व प्रस्ताव सहायक महानगर नियोजनकार, रचना सहायक यांनी सह/उप महानगर नियोजनकार (विशेष) व संचालक, विकास परवानगी व नियोजन यांच्यामार्फत आयुक्त यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित आदेश आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारी (दि. १८) काढला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.


