सासवड : श्री संत सोपानकाका महाराज यांच्या संजीवनी समाधी मंदिरामध्ये श्री संत सोपानकाका महाराज यांचा समाधी सोहळा उद्यापासून (सोमवार, दि. २३) सुरू होत असून, सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी प्रक्षाळ पूजेने सोहळ्याची सांगता होणार आहे. हा सोहळा सोपानकाका मंदिरामध्ये साजरा होणार असल्याची माहिती श्री सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.
उद्या, सोमवारी (दि. २३) पहाटे मंदिरात उत्सवमूर्तीना अभिषेक, महापूजा, काकडां आरती व हभप संभाजी महाराज बडधे यांच्या कीर्तनाने सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. सायंकाळी हभप विजय महाराज भिसे यांचे प्रवचन, रात्री सोपानदेव देवस्थानतर्फे कीर्तन आणि सासवडच्या हनुमान भजनी मंडळाचे भजन, जागर होणार आहे.
सांगता सोहळ्यादिवशी सोमवारी (दि. ३०) सकाळी ९ ते ११ पर्यंत हभप म्हस्कूजी महाराज कामठे यांचे कीर्तन, ११. ३० वा. ते १२ वा.पर्यंत संत सोपानदेव समाधीस गरम पाण्याने प्रक्षाळ पूजा घालण्यात येणार आहे. सायंकाळी देवस्थानतर्फे प्रवचन, हरिपाठ. रात्री देवस्थानतर्फे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती अॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.


