नवी दिल्ली: देशाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी डिजिटल उत्पादनांना प्रोत्साहन देत मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि गुगल डॉक्सवरून झोहो अॅपकडे स्विच करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशात स्वदेशी अॅप्सच्या वापराला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे. अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत झोहो अॅपचा वापर सुरू केल्याचे सांगितले.
झोहो अॅप काय आहे?
झोहो हे पूर्णपणे स्वदेशी सॉफ्टवेअर असून 1996 मध्ये श्रीधर वेम्बू आणि टोनी थॉमस यांनी त्याची स्थापना केली. चेन्नईस्थित झोहो कॉर्पोरेशन ही एक Software-as-a-Service (SaaS) कंपनी असून ती जगभरातील कंपन्यांना व्यवसायासाठी 55 हून अधिक सेवा देते. झोहोच्या सेवांमध्ये ईमेल, अकाउंटिंग, एचआर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सीआरएम, कॅलेंडर, मेल आणि ऑफिस सूट यांचा समावेश होतो. सध्या जगातील 150 देशांमध्ये 100 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते झोहो अॅपचा वापर करतात.
I am moving to Zoho — our own Swadeshi platform for documents, spreadsheets & presentations. 🇮🇳
I urge all to join PM Shri @narendramodi Ji’s call for Swadeshi by adopting indigenous products & services. pic.twitter.com/k3nu7bkB1S
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 22, 2025
दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, स्वदेशी अॅप्सचा स्वीकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा निर्णय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय वापरकर्त्यांमध्ये झोहोसारख्या स्थानिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


