Bihar Assembly Elections 2025: यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. अंतिम मतदार यादी लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. बिहारमधील राजकीय पक्षांनीही त्यांची तयारी तीव्र केली आहे. जागावाटपावरून महाआघाडीत गोंधळ सुरू असताना, भाजपने त्यांचे निवडणूक प्रभारी देखील नियुक्त केले आहेत. निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच मतदार यादी जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप युतीला आपली सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे, तर विरोधकांना पुन्हा सत्तेत परतण्याची संधी आहे. विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत असल्याने 5 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपने निवडणूक तयारीसाठी केले मोठे बदल –
भाजपने बिहारसह तीन राज्यांमध्ये प्रभारी, सह-प्रभारी आणि सह-प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. बिहार निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी करण्यात आले आहे, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सह-प्रभारी, आणि सीआर पाटील यांना सह-प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी 25 सप्टेंबर रोजी याबाबत अधिकृत पत्र जारी केले.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतही तयारी
बिहारप्रमाणेच भाजपने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतही संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. भूपेंद्र यादव यांना पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी प्रभारी नेमले असून, बिप्लब देब यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तामिळनाडूसाठी खासदार बिजयंत पांडा प्रभारी आणि राज्यमंत्री मुरलीधर माहोल सह-प्रभारी असतील.
दरम्यान, बिहारमधील निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर आल्यामुळे भाजपचे मुख्य लक्ष या राज्यावर आहे. त्याचवेळी, 2026 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठीही पक्षाने आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


