अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान होऊन जनावरांसह अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. काही कुटुंबांनी आपल्या जिवलग सदस्यांना गमावले आहे. जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यांना या पावसाचा विशेष फटका बसला आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावात 31 वर्षीय अतुल शेलार या युवकाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या तरुणाच्या मृत्यूने शेलार कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी अतुल गावात आलेल्या अधिकाऱ्यांसोबत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेला होता.
दिवसभर काम पूर्ण करून तो संध्याकाळी साडेसहा वाजता परतत असताना कावजवळच्या ओढ्यावरून जाताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यानंतर तीन दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर 23 सप्टेंबर रोजी खडकेवाडी परिसरात त्याचा मृतदेह सापडला. अतुलचे वडील रावसाहेब शेलार हे ग्रामपंचायतीत शिपाई असून मुलगा त्यांना मदत करायचा. शांत आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे तो गावातील सर्वांचा लाडका होता. मात्र, ओढ्यावर असलेला कमी उंचीचा पूल हीच या दुर्घटनेचे मुख्य कारण असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
या पुलाची उंची तातडीने वाढवली पाहिजे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडतील, अशी मागणी ग्रामस्थांसह शेलार कुटुंबाने केली. दरम्यान, अतुलला ग्रामपंचायतीच्या कामाबरोबरच इतर विभागांच्या कामासाठीही वारंवार पाठवले जात असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.


