Maharashtra Rain News : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या-नाल्यांना पूर आला आहे. शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी उद्या (27 सप्टेंबर) पासून दसऱ्यापर्यंत (2 ऑक्टोबर) पुढील 6 दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे उद्या (27 सप्टेंबर) सकाळपर्यंत तीव्र कमी दाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे 27 सप्टेंबरपासून दसऱ्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा धोका कोणत्या जिल्ह्यांना?
– 27 सप्टेंबर : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा), धाराशिव, लातूर आणि नांदेड येथे अतिजोरदार पावसाची शक्यता.
– 28 सप्टेंबर : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर (घाटमाथा) येथे अतिवृष्टीचा इशारा.
– 29 आणि 30 सप्टेंबर : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर (घाटमाथा) येथे अतिजोरदार पाऊस अपेक्षित.
3 ऑक्टोबरपासून उघडीप?
3 ऑक्टोबरपासून काहीशी उघडीप जाणवण्याची शक्यता आहे, परंतु पूर्णपणे पाऊस थांबण्याची शक्यता कमी आहे.
नद्या आणि धरणांना पूराचा धोका
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नांदेडला ऑरेंज अलर्ट, शाळांना सुट्टी
हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यासाठी 27 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रवासीयांनी पुढील 6 दिवस सावध राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात येत आहे.


