निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. त्यात हृदयाची काळजी घेणेही गरजेचे बनते. सध्या हृदयविकार आणि स्ट्रोकच्या वाढत्या घटनांमुळे आपल्याला आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी हृदय राखण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही बदल करावे लागतील. याने तुम्हाला फायदाही होऊ शकतो.
काही फळांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात सफरचंदही आहे. सफरचंदांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉल असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. दररोज सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. ही फळे नाश्त्या म्हणून देखील खाल्ली जातात. त्यामुळे डॉक्टरांकडूनही नेहमीच सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात द्राक्षही फायद्याची ठरतात. गोड आणि आंबट द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल आणि अँथोसायनिन्स सारखे फायटोकेमिकल्स असतात, जे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करतात, ज्यामुळे जळजळ कमी होते.
तसेच, आपल्या दैनंदिन आहारात द्राक्षे समाविष्ट केल्याने सिस्टोलिक रक्तदाब कमी होऊ शकतो. रक्तदाब नियंत्रित केल्याने हृदयरोग टाळण्यास देखील मदत होते. ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी हे अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळ आहेत जे हृदयाचे आरोग्य सुधारतात. ते धमन्यांमध्ये जळजळ आणि प्लेक जमा होण्यास मंदावतात. या फळांचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. निरोगी हृदय राखण्यासाठी तुमच्या आहारात ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करणे फायदेशीर आहे.


