Rohini Khadse: पुण्यतील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना जामीन मिळाला आहे. तरीही या प्रकरणातील गुंतागुंत वाढताना दिसत आहे. आता या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची सिमकार्ड बदल प्रकरणात पुणे पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळले होते. खेवलकर अटकेत असतानाच ‘सोनार’ या व्यक्तीने आपले सीम हरवल्याचा बनाव करत त्याच नंबरचे नवीन सीमकार्ड घेतले. हे सिम नवीन मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सॲपसह महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला, असा गंभीर आरोप पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.
रोहिणी खडसेंची दीड तास चौकशी
या प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असून, पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार आज त्यांची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून दीड तास सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांचा लिखित जबाब नोंदवण्यात आला. चौकशीनंतर रोहिणी खडसे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी सांगितले की, “पोलिसांनी विचारलेले प्रश्न आम्ही स्पष्टपणे उत्तरले आहेत. आम्ही कोणतेही अंमली पदार्थ घेतलेले नाही, हे फॉरेन्सिक रिपोर्टवरूनही सिद्ध झाले आहे. पुराव्यांची छेडछाड झाल्याचा जो संशय व्यक्त केला जातो आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.” तसेच, “संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक माहिती देणं उचित ठरणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.


