Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतून एक मोठी राजकीय घोषणा करण्यात आली. राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत (Nagaradhyaksha Reservation Draw) जाहीर करण्यात आले. या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे निश्चित होणार असल्याने, संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या आरक्षणाकडे लागले होते.
68 नगरपरिषदा ‘खुल्या महिलां’साठी आरक्षित
या सोडतीमध्ये महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून, अनेक महत्त्वपूर्ण नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाले आहे. एकूण 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पंढरपूर, परळी वैजनाथ, रत्नागिरी, अंबरनाथ, खामगाव, बार्शी, भंडारा, उदगीर, अलिबाग, सांगमनेर, तासगाव यासह पन्हाळा, पाचोरा, पैठण अशा महत्त्वाच्या नगरपरिषदांचा समावेश आहे.
34 नगरपरिषदा इतर मागासवर्गीय (OBC) महिलांसाठी आरक्षित
यामध्ये धाराशिव (उस्मानाबाद), हिंगोली, कुळगाव बदलापूर, विटा, माजलगाव, चोपडा, रोहा यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. तथापी, अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलांसाठी 16 नगरपरिषदा आरक्षित झाल्या आहेत. यात भुसावळ, शिर्डी, बीड, देऊळगावराजा, मोहोळ यांचा समावेश आहे.
हेही वाचा – आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा – ॲड. प्रकाश आंबेडकर
147 नगरपंचायतींमध्येही मागास प्रवर्गाला संधी
दरम्यान, 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. पारनेर, मंचर, माळशिरस, आष्टी (बीड), कणकवली, कळवण, पाटोदा यासह सुमारे 40 हून अधिक नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षणाची घोषणा झाली आहे. यापैकी पोलादपूर, तलासरी, वडवणी, कळवण, घनसावंगी, माढा यांसारख्या नगरपंचायतींची नगराध्यक्षपदे ओबीसी महिलांसाठी राखीव झाली आहेत. तथापी, मोहडी, वाशी, गुहागर, लांजा, वडगाव मावळ, शहापूर, देहू यासह अनेक नगरपंचायतींमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांना संधी मिळाली आहे. या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आता स्थानिक पातळीवर उमेदवारीसाठी आणि राजकीय डावपेचांना गती मिळणार आहे.


