पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा सध्या चर्चेचा विषय ठरत असून, या चर्चांमुळे भाजपच्या स्थानिक संघटनात अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. या चर्चांवर आमदार पठारे यांनी यापूर्वीच ‘ही फक्त अफवा आहे’ असा खुलासा केला होता. मात्र पक्षातील हालचालींवरून पाहता काहीतरी मोठं शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. काही वरिष्ठ नेते या प्रवेशासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं जातंय, तर स्थानिक नेतृत्व हा प्रवेश रोखण्यासाठी थेट मुंबईपर्यंत प्रयत्न करत आहे. यामुळे पक्षातील मतभेद आणि अंतर्गत वाद उफाळले आहेत.
पक्षाशी निष्ठा राखून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या संभाव्य प्रवेशामुळे अस्वस्थता पसरली आहे. “वारे बदलले की पक्ष बदलणाऱ्यांना संधी मिळते, पण वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांचं काय?” असा सवाल स्थानिक नेते विचारत आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. अलीकडेच वडगाव शेरीतील शिष्टमंडळाने शहराध्यक्षांची भेट घेऊन, “बाहेरील लोकांना घेऊ नका; स्थानिक निष्ठावंतांना संधी द्या,” अशी मागणी केली.
भाजपच्या वाढत्या संघटनेत ‘इन्कमिंग’सोबत संघटनेतील जुने कार्यकर्ते नाराज होतात. नव्या चेहऱ्यांना स्थान मिळाल्यास जुने कार्यकर्ते नाराज होतात, त्याचा थेट परिणाम पक्षाच्या मतांवर होतो. “आम्ही अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहोत. बाहेरील लोकांना घेतल्यास आमचं मनोबल खचेल. पक्षाने भूमिका स्पष्ट करून निष्ठावंतांना विश्वास द्यावा,” अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शहराध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.


