पुणे: पक्ष वेगळे झाले, राजकीय मार्ग वेगळे झाले, रोहीत पवार-अजित पवार यांच्यामध्ये कोणतेही राजकीय सौख्य नसल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून वारंवार करण्यात येतो. पण दोघांपैकी कोणीही अडचणीत आल्यावर त्यांच्यातील एक जण हमखास दुसऱ्याची बाजू लावून धरतो. त्यासाठी ते आपल्या पक्षाविरोधात भूमिका घेण्यास मागंपुढं पाहत नाही हे सुद्धा पुन्हा पुन्हा अधोरेखित झालंय. त्याचीच प्रचिती आता पुन्हा पहायला मिळाली आहे. भाजपकडून निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्याशी रोहित पवारांचे मैत्रीचे संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांची पाठराखण केलीय. याबाबत बोलताना अजितदादांनी पाठराखण करताना “कुणासोबत फोटो आला म्हणजे लगेच दोषी होत नसतो“,असं अजितदादांनी म्हटलंय.
अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यांचा राजकीय मार्ग 2023 लोकसभा निवडणुकीवेळी वेगवेगळा झालाय. मात्र, त्यानंतरही अडचणीत असल्यास ते दोघे एकमेकांसाठी धावून येतात.आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अजितदादा वादात सापडले होते. त्यावेळी अजितदादांच्या पक्षाआधी रोहित पवारांनी अजितदादांची पाठराखण केली होती.
गुंड सचिन घायवळसोबतचा रोहित पवारांचा फोटो समोर आल्यानं रोहित पवार थोडेसे अडचणीत आलेत. भाजपनं तर निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्याशी रोहित पवारांचे मैत्रीचे संबंध असल्याचा आरोप केलाय. भाजपनं रोहित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडलेल्या असताना अजितदादा पुतण्याच्या मदतीचा धावून आलेत. फोटो असला म्हणूजे रोहित पवारांचे घायवळशी संबंध आहेत असं होत नाही असं अजितदादांनी सांगितलंय.


