पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्कील विधानांसाठी ओळखले जातात. त्याच्या या वागण्याचे एक उदाहरण त्यांच्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यामध्ये दिसले. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकांसोबत संवाद साधताना एका लाडक्या बहिणीकडून त्यांना शेवग्याच्या शेंगा भेट म्हणून मिळाल्या. त्या त्यांनी स्वीकारल्या मात्र, त्यावर त्यांनी समोर असलेल्या महिलेला अक्षरश: हात जोडले. त्याशिवाय, त्यानी दिलेली प्रतिक्रीया ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यामध्ये अजित पवार हे सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठींदरम्यान अनेक उत्साही समर्थक आणि कार्यकर्ते अजित पवारांना भेटत आहेत. अजित पवार आज धनकवडीत राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यावर असताना बारामतीच्या एका महिलेने त्यांना खास भेट दिली.
या लाडक्या बहिणीने उपमुख्यमंत्र्यांना शेवग्याच्या शेंगा भेट म्हणून दिल्या. या महिला समर्थकाने अजित पवारांना त्यांच्या गाडीजवळच गाठलं. अजित पवार गाडीमधून उतरुन काही पावलं पुढे चालथ आल्यानंतर ही महिला पुढे आली. तिच्या हातात एक पिशवी होती ज्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि काही भाज्या होत्या. ती पिशवी या महिलेने अजित पवारांच्या हातात टेकवली.
View this post on Instagram
शेवग्याच्या शेंगा देताना ही लाडकी बहीण काय म्हणाली?
“दादा आम्ही बारामतीचेच आहोत,” असं ही महिला म्हणाली. त्यावर अजित पवारांनी बारातमीच्या कुठल्या असं विचारलं असता त्या महिलेनं गावाचं नाव सांगितलं. या महिलेने अजित पवारांच्या हातात भाजीची पिशवी देत, “ही भाजी तुम्हाला आवडते असं आम्हाला बोलण्यातून कळलं. त्यामुळे तुम्ही ही भाजी तुम्ही करुन खा,” असं अगदी प्रेमाने सांगितलं. अजित पवारांनी भाजीची ही पिशवी घेत मागे उभ्या असलेल्या आपल्या सुरक्षारक्षकाच्या हाती सोपवली.
अजित पवारांचा भन्नाट रिप्लाय
अजित पवार हे त्यांच्या मिश्कील टीप्पण्या आणि टोल्यांसाठी ओळखले जातात. सार्वजनिक सभा असो, पत्रकार परिषद असो किंवा कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना केलेली विधानं असो अजित पवार हे एखादाच असा टोला मारतात की उपस्थितांमध्ये हशा पिकल्याशिवाय राहत नाही. असाच रिप्लाय अजित पवारांनी या प्रेमाने शेवग्याच्या शेंगा देणाऱ्या लाडक्या बहिणीला दिला. प्रेमाने दिलेली भाजी स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी या लाडक्या बहिणीसमोर हात जोडत, “बायकोला सांगतो बहिणीने भाजी दिली आहे. आता तू बनवून मला खायला घाल,” असं म्हटलं आणि सर्वच उपस्थितांमध्ये हशा पिकला.


