पुणे : ‘मना’चे श्लोक’ चित्रपट नुकताच रिलीज झाला. चित्रपटाच्या नावावरून मोठा वादा निर्माण झाला आहे. सज्जनगड रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीनं या चित्रपटाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. धार्मिक ग्रंथ मनाचे श्लोक या नावाचा चित्रपटासाठी वापर केल्याने श्रद्धावानांच्या भावना दुखावल्या असल्याचं संस्थानने म्हटलं होतं. “जर चित्रपटाची कथावस्तू श्री समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीशी सुसंगत नसेल, तर असं नाव वापरणं हे दिशाभूल करणारं, अभद्र आणि अपमानास्पद आहे. हे नाव कायम ठेवल्यास आम्हाला कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशाराही देण्यात आला होता. त्यांनी निर्मात्यांना पत्रकाद्वारे चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही चित्रपटाचे नाव बदलण्यात आले नाही. त्यावर आता दोन्ही संघटना आक्रमक झाल्या आहेत.
हा चित्रपट अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने लिहून दिग्दर्शित केला आहे. त्यात राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, करण परब आणि गौतमी देशपांडे यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रीमियरला कलाकारांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्यात थिएटरमध्ये जावून संघटना ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाचे शो बंद पाडत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील सिटीप्राइड आणि अभिरुची थिएटरमधील चित्रपटाचे शो बंद पाडले. या घटनेनंतर अभिरुची थिएटरमध्ये शो थांबवणाऱ्या उज्वला गौड आणि इतर काही कार्यकर्त्यांवर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सरकारी कामात अडथळा आणणं आणि गोंधळ घालणं या कलमांअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
उज्वला गौड या भाजप आणि हिंदू संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. शो सुरू होण्याआधीच कार्यकर्ते घोषणाबाजी करत थिएटरमध्ये घुसले आणि चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली. प्रेक्षकांनी मात्र चित्रपट दाखवण्याचा आग्रह धरल्याने वाद आणखी चिघळला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाहेर नेलं, मात्र बाहेर घोषणाबाजी सुरूच राहिली. अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतरही शो रद्द करण्यात आला.


