बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची १३२ कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विक्री करण्याच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील पांगरी येथील या कारखान्याच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
संघटनेने हा व्यवहार ‘कवडीमोल’ दराने करून बँक कर्ज बुडवण्याचा प्रयत्न असल्याचा सनसनाटी आरोप केला असून, दोषींवर कारवाई न झाल्यास गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला आहे.
१४ ऑगस्ट २०२५ रोजी अंबाजोगाई येथील रजिस्ट्री कार्यालयात हा व्यवहार नोंदवण्यात आला. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष असून, संचालक मंडळासह त्यांची सह्या करारावर असल्याचे सांगितले जाते. मात्र, संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाईमध्ये कसा विकला? असा सवाल उपस्थित केला आहे.
कारखाना कौठळी तांडा येथील कुळाच्या जमिनीवर उभारलेला असून, अशा जमिनीवर विक्रीला कायदेशीर मर्यादा असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, करारावर पंकजा मुंडे व संचालक मंडळाच्या सह्या असल्या तरी त्यांच्या धाकट्या बहिणी प्रीतम मुंडे यांची सही नसल्याचे समोर आले आहे. प्रीतम मुंडे यांनी हा व्यवहार मान्य केला नव्हता का? असा प्रश्न उपस्थित करत, संघटनेने शेतकरी व सभासदांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला आहे.
बँक कर्ज बुडवण्याचा प्रयत्न?
संघटनेचा ठाम आरोप आहे की, हा व्यवहार बँकांचे बुडेल कर्ज वसूल करण्याच्या नावाखाली केला गेला असून, कारखान्याची खरी किंमत १३२ कोटींपेक्षा कितीतरी अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये जीएसटी विभागाने कारखान्यावर १९ कोटींची मालमत्ता जप्त केली होती, ज्यात साखर विक्रीवरील कर वसुलीचा मुद्दा होता.
पंकजा मुंडे यांनी त्या वेळी कारखान्याची आर्थिक कोंडी असल्याचे सांगितले होते आणि शेतकऱ्यांना प्राधान्याने पैसे दिल्याचा बचाव केला होता. आता विक्रीमुळे बँक कर्ज बुडविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत असून, संपूर्ण व्यवहाराची चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
गीतेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज व उपोषणाचा धमकी
कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनीही या विक्रीला गंभीर आक्षेप घेतला आहे. पूर्वी कारखान्याशी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या गीतेंनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून खरेदीखतावर तात्काळ स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. “हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या अवैध असून, शेतकऱ्यांचे हित धोक्यात आहे,” असा त्यांचा युक्तिवाद आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, दोषींवर कारवाई झाली नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषणाला बसले जाईल. या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे, विशेषतः पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यातील जुने वैर लक्षात घेता.


