Pune Crime: पुणे ग्रामीण भागातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने सहा वाहनांना जोरदार धडक देत अनेकांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा कॉन्स्टेबल स्वतः रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. मात्र, घटनेनंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही, तसेच वैद्यकीय तपासणीही केली गेलेली नाही, यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉन्स्टेबलचे नाव हेमंत इनामे असे असून, तो रविवारी रात्री एका पार्टीला गेला होता. पार्टीदरम्यान त्याने मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले आणि त्यानंतर दारूच्या नशेतच कार चालवून तो पुणे–नगर महामार्गावर आला. गाडीवरील ताबा सुटल्याने इनामेने सलग सहा वाहनांना धडक दिली, ज्यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा – पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात, फटाक्यांच्या दुकानांबाबत आयुक्तांचा खास निर्णय, वाचा
अपघातानंतरही पोलिसांची निष्क्रियता
अपघातानंतर रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा नोंदवण्यापुरतेच पाऊल उचलले, परंतु आरोपी कॉन्स्टेबलला ना अटक करण्यात आली, ना वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यामुळे या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
नागरिकांचा संताप आणि कठोर कारवाईची मागणी
या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असता, तरीही आरोपी पोलीस मोकाट फिरत आहे, हे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे सखोल चौकशी करून संबंधित कॉन्स्टेबलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या सामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जाते, पण कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या व्यक्तीनेच कायदा तोडला, तरीही कारवाई होत नसल्याने हा प्रकार पोलिस यंत्रणेवरील विश्वासाला धक्का देणारा ठरत आहे.


