मुंबई: महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेटीसाठी दाखल झाले. या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अजित नवले, ठाकरे गटाचे अनिल देसाई, अनिल परब, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रईस शेख आणि कॉ. प्रकाश रेड्डी उपस्थित होते. बैठकीत राज ठाकरे यांनी मतदार यादीतील गंभीर गडबडी, प्रभाग रचना आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की:
- मतदार यादीत प्रचंड गडबडी आहे, काही मतदारांची नावे दोन ठिकाणी आहेत. हे कसे शक्य?
- वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवल्याचे प्रकरणे यादीत आहेत. ही विसंगती का?
- निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी का थांबवली?
- आज जे १८ वर्ष पूर्ण करीत आहेत, त्यांना मतदान का करायला नाही दिले?
- स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात येणार नाही, हा निर्णय विरोधाभासी आहे. मतदान कोणाला जात आहे हे मतदारालाही माहित असले पाहिजे.
याबरोबरच, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी १८ नोव्हेंबरला आयोगाला पाठवलेल्या पत्रांबाबत प्रश्न उपस्थित केले, ज्यात खोट्या मतदार नोंदणीची माहिती दिली होती. बैठकीदरम्यान ठाकरे बंधू आणि विरोधी पक्षांचे नेते आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी निवडणूक आयुक्तांसोबत उद्या सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. शिष्टमंडळाच्या बैठकीत मतदार यादीची पारदर्शकता, प्रभाग रचना, व्हीव्हीपॅट मशीन वापर आणि निवडणूक तयारीची तपासणी यावर सविस्तर चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आयोगाला त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून निवडणुकीत कोणतीही विसंगती किंवा गडबड होणार नाही.


