Vaibhav Khedekar Join BJP: माजी मनसे नगराध्यक्ष आणि राज ठाकरे समर्थक वैभव खेडेकरयांनी अखेर भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संतोष नलावडे यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश अधिकृत झाला. खेडेकर यांचा पक्षप्रवेश कोकणातील भाजपच्या स्थानिक संघटनेला बळकटी देण्याच्या रणनीतीत महत्त्वाचा मानला जात आहे.
तीन वेळा ढकलला गेला पक्षप्रवेश
वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश मागील काही महिन्यांपासून चर्चेत होता, मात्र तो तब्बल तीन वेळा पुढे ढकलला गेला होता. पक्षप्रवेशाच्या तयारीदरम्यान येणाऱ्या अडचणींमुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आज झालेल्या अधिकृत प्रवेशामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
वैभव खेडेकर यांची राजकीय पार्श्वभूमी
खेडेकर हे मनसेचे जुने नेते आणि कोकणातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची प्रतिमा होती, परंतु अलीकडच्या काळात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाशी त्यांची जवळीक वाढली होती. भाजपमध्ये जाण्याच्या तयारीदरम्यान मनसेने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती.
भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकर यांनी म्हटलं आहे की, ‘पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका वाक्यात सांगता येणार नाही. अनेक कारणांनी विलंब झाला, पण आता आमचा भर भाजप बळकट करण्यावर असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत संघटना तयार करणे हा आमचा उद्देश आहे. मनसेतील अनेक नेत्यांसोबत भावनिक नाती होती, ती आज थांबत आहेत, पण भाजपने मला आपलंसं केल्याचा आनंद आहे.’
हेही वाचा – वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
याच दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही नेते, जसे की ॲड. ललिता शाम पाटील आणि माजी कृषी बाजार समिती संचालक पराग पाटील, एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश हे कोकणात पक्षाची पायाभूत ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मजबूत संघटना तयार करण्यासाठी रणनीतीचा भाग मानला जात आहे.


