Sharad Pawar and Ajit Pawar: गेल्या काही दिवसापासून अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात आज पुन्हा बारामतीत एका सभेनिमित्त शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र दिसले. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. पण नेमके शरद पवार आणि अजित पवार एकत्र का आले? तर आज दोघांनी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेसाठी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये एका खुर्चीचे अंतर होते. सभेपूर्वी अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली.
या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष म्हणून शरद पवार होते. तर, विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, खजिनदार म्हणून युगेंद्र पवार ही या ठिकाणी उपस्थित होते. वार्षिक सभा विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या सभागृहामध्ये पार पडली. या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संस्थेच्या कार्यालयात बैठक देखील झाली.
चार दिवसांपूर्वीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले होते. ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला उपस्थित राहिले होते. या बैठकीत साखर कारखान्यांच्या समस्या आणि साखर उद्योगासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली.


