अहिल्यानगर : पद्मभूषण अण्णा हजारे एक प्रेरणा पुरुष आहेत. तर पोपटराव पवार समाज पुरुष आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा वधुवरांसह राज्यातील तरुण पिढीने घ्यावी आणि आपल्या भावी आयुष्यात असेच काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे सुपुत्र प्रसन्न व अशोक भगत यांची कन्या तनुजा यांच्या लग्न समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर अहिल्यानगरला आले होते. यावेळी हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने फडणवीस यांना मानपत्र देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आपण ज्या प्रकारे आपले घर आणि संसार सांभाळतो, त्याप्रमाणे समाज कसा सांभाळावा याचा आदर्श हजारे व पवार यांनी घालून दिला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा वधुवरांसह राज्यातील तरुणांनी घ्यावी. अण्णांनी नववधुवरांना त्यांच्या हातून देशाची व समाजाची सेवा घडो असे सांगून त्यांनी यांचे वैवाहिक जीवन सुख समृद्धीचे जावो, असे आशीर्वाद दिले.


