Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात म्यानमारच्या दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि जऊळका दरम्यान, कॉरिडॉर क्रमांक 232 वर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून नागपूरकडे जात असलेली इनोव्हा कार नियंत्रण सुटल्यामुळे अपघातग्रस्त झाली.
सदर इनोव्हा कार जगन्नाथपुरीकडे निघाली होती. मात्र, प्रवासादरम्यान चालकाला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि कार महामार्गावरील लोखंडी रेलिंग तोडून खाली जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला आणि म्यानमारमधील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची मालिका वाढत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण गेले होते. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


