पुणे: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा, अशी मागणी केली आहे. या विधानामुळे पुण्यात धार्मिक भावभावनेवर आघात झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे की, खासदार असूनही मेधा कुलकर्णी यांना कायद्याची आणि सामाजिक समजुतीची अजिबात अक्कल नाही. त्या स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी मानतात, परंतु कोणत्याही धर्मावर वाद निर्माण करण्याचा अधिकार त्यांना नाही. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुढे म्हटलं की, शनिवारवाडा मेधा कुलकर्णी यांचा नाही आणि हिंदू-मुस्लीम बांधव पुण्यात शांततेने राहतात. कोणत्याही धर्मावर आधारित द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयाचा मार्ग धरू.
दरम्यान, या वादाची सुरुवात मेधा कुलकर्णी यांनी मुस्लीम महिलांनी शनिवारवाड्यात नमाज पठण करणारा व्हिडिओ व्हिडिओ ट्विट केल्यामुळे झाली. पाटील ठोंबरे यांनी या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, हा व्हिडिओ खरा समजला तरी, नमाज पठण केल्यामुळे कोणता धोका निर्माण झाला? हिंदू धर्मीयांमध्ये सौभाग्याचे प्रतीक हिरवा रंग आहे, मग त्याच्यावर द्वेष का? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, शनिवारवाड्याच्या पुढे असलेल्या मजारीची नोंद पुरातत्व विभागाकडे १९३६ पासून आहे. तरीही, केवळ हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट केले की, आमचा संघर्ष भाजपशी नाही, तर मेधा कुलकर्णी यांच्या द्वेषपूर्ण वर्तनाविरोधात आहे.


