पुणे: शनिवार वाड्यातील वादग्रस्त घटनेनंतर राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये नियम मोडल्याचा आरोप होत असतानाच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील वास्तू आहे. तिथे काही नियम आहेत आणि त्याचं पालन झालं पाहिजे. जर नियम मोडले गेले असतील, तर त्यासाठी राज्य सरकार, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. कोणीही स्वतःला सरकार समजून वागू नये, असा कडक इशारा गोऱ्हे यांनी दिला.
शनिवार वाड्यातील वादाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शनिवार वाड्याच्या परिसरात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने शनिवारी आंदोलन छेडले. त्यांनी नमाज पठण झालेल्या ठिकाणी जाऊन ‘शिववंदना’ करण्याचा आणि त्या भागात गोमूत्र शिंपडण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारताच कुलकर्णी संतापल्या आणि पोलिसांशी तीव्र वाद झाला.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अशा संवेदनशील ठिकाणी संयम राखला पाहिजे. जर महिलांनी नमाज पठण केले असेल, तर त्यांच्याकडूनही नियमांचे पालन अपेक्षित आहे. उद्या कोणी म्हणेल की मशिदीत जाऊन कीर्तन करायचं, पण म्हणून ते परवानगीशिवाय करता येईल का? इतिहास आणि वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभागाचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. याच वेळी गोऱ्हे यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केलं. युतीत असलो म्हणून मुद्दे मांडू नयेत असं नाही. लोकशाहीत प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आमच्या मंत्र्यांबद्दलही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे कोणी काही बोललं की ते लगेच ‘विरोधात बोलतंय’ असं म्हणणं चुकीचं आहे, असं त्या म्हणाल्या.
भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर यांचा उल्लेख करत गोऱ्हे पुढे म्हणाल्या, धंगेकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे म्हणूनच ते बोलतात. हेतूपुरस्सर आरोप करण्यापेक्षा वास्तवावर आधारित चर्चा व्हायला हवी. जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे हेच सर्वांचे कर्तव्य आहे.


