Manikrao Kokate : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे भूसंपादनाचा वाद चिघळत चालला असून आता या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांनी थेट उडी घेतली आहे. कुंभमेळ्यासाठी रिंग रोड आणि सुरत-चेन्नई महामार्ग या प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने रिंग रोडसाठी सक्तीचे भूसंपादन सुरू केले. याचवेळी सुरत-चेन्नई महामार्गासाठी सिन्नरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदल्यात संपादित केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत असून, योग्य भरपाई न मिळाल्याने नाराजी तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपालिकेत झालेल्या बैठकीत कोकाटे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला. “शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर महामार्गाचे काम थांबवू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी फळझाडे, विहिरी, बोअरवेल आणि बांधकामांचे मूल्यांकन कमी केल्याचा आरोप केला. यावर कोकाटे यांनी संबंधित विभागांनी संयुक्तपणे फेरमूल्यांकन करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या भूसंपादनालाही आधीच विरोध होत असताना आता या नव्या वादामुळे सिन्नरमधील वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


