मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अदानी आणि अंबानींसाठी आंदण देण्याच्या धोरणावर टीका करताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरवला जात आहे. त्यावेळी भाजपला मतदान करणारा मराठी माणूसही त्यात भरडला जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. महाराष्ट्रात आणि मुंबईत जर मराठी माणसाच्या थडग्यावर उभं राहून विकास होणार असेल, तर मी ते कधीच खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या या विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राज ठाकरेंचा दृष्टिकोन संकुचित आणि मुंबईच्या आत्म्याला दुखावणारा असल्याचं रामदास आठवले म्हणाले. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही, तर ती गुजराती आणि मराठी संस्कृतींच्या संगमातून घडलेली आहे. या शहराच्या बांधणीत दोन्ही समाजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मुंबईला केवळ मराठी ओळखीपुरती मर्यादित करणं चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
आठवले पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी लढा दिला, पण त्यांनी कधीच मुंबईकडे संकुचित दृष्टीने पाहिलं नाही. राज ठाकरे भाषणं उत्तम करतात, व्यंग्यात्मक बोलतात, पण त्यांच्या वक्तव्यांतून ठोस बदल झालेला दिसत नाही. महाराष्ट्राला केवळ भाषणांनी नव्हे, तर शिक्षण, रोजगार आणि बहुजन विकासाच्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.
हेही वाचा –वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
निवडणूक प्रक्रियेवरही राज ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, राज ठाकरे यांनी गोरेगावमध्ये झालेल्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्यात निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. मतदान करा किंवा करू नका, मॅच फिक्सिंग आधीच झालंय. मतदार यादीत खोटे नावे भरली आहेत. ही निवडणूक मतदारांचा अपमान आहे, अशी टीका केली. त्यांनी पुढे सांगितले की, जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. सत्तेवर कोण येतं याचं महत्त्व नाही, पण मतदान खऱ्या मतदारांकडूनच झालं पाहिजे, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं.


