पुणे: शनिवारवाड्यात काही महिलांनी सामूहिक प्रार्थना (नमाज पठण) केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी ‘पतीत पावन संघटना’सोबत शनिवारवाड्याच्या परिसरात ‘शिववंदना’ करण्याचा प्रयत्न केला, तसेच गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी मात्र या कारवाईला आळा घातल्याने मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली.
या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का?’ शनिवारवाडा प्रकरणावर बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘नमाज पठणासाठी महाराष्ट्रात जागेचा अभाव आहे का? शनिवारवाडा हे हिंदू समाजाच्या इतिहासाचं प्रतीक असलेलं स्थळ आहे. तिथे नमाज पठण करण्याची गरज काय? जर तिथे असं होऊ शकतं, तर उद्या आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हणतील, मग त्यावरही काही आक्षेप घेऊ नका.’
हेही वाचा – Shaniwar Wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण; अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, ‘जो न्याय हाजी अलीला लागू होतो, तोच शनिवारवाड्यासारख्या इतर धार्मिक प्रतीकांनाही लागू झाला पाहिजे. वातावरण कोण बिघडवत आहे हे सगळ्यांना दिसतंय. काही जिहादी मानसिकतेचे लोक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे हिंदू संघटनांनी आवाज उठवला, तर त्यात गैर काही नाही, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत, महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, राज ठाकरे अनेकदा मुद्देसूद बोलतात आणि लोक त्यांचं ऐकतात, पण आता प्रश्न असा आहे हे व्होट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत?
नितेश राणे यांनी पुढे म्हटलं की, लोकसभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले तेव्हा कोणीच ‘व्होट जिहाद’ किंवा ‘खोटे मतदार’ यावर भाष्य केलं नाही. आता भगव्या विचारांचं सरकार आलं, म्हणून अचानक हे आरोप सुरू झाले आहेत. राज ठाकरे आजकाल ज्या लोकांसोबत बसतात, त्या संगतीचा परिणाम त्यांच्या वक्तव्यांमध्ये दिसतोय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यावर कोणाच्याही विचारांची दिशा बदलू शकते, असा टोला त्यांनीही त्यांनी यावेळी लगावला.
शनिवारवाड्यातील सामूहिक प्रार्थनेपासून सुरू झालेला वाद आता राजकीय आणि धार्मिक पातळीवर चांगलाच भडकला आहे. एका बाजूला भाजप नेते आणि मंत्री हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर दुसरीकडे विरोधक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास आणि राजकीय घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


