पुणे: ऐतिहासिक शनिवारवाड्यात काही महिलांनी सामूहिक प्रार्थना (नमाज पठण) केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शहरात वातावरण तापले आहे. या घटनेच्या विरोधात काल विविध संघटनांनी निदर्शने केली होती. संघटनांकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाड्यात काही महिलांनी सामूहिक प्रार्थना केली होती. या घटनेचा व्हिडिओ रविवारी समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर काही संस्थांनी आक्षेप घेत आंदोलन केले. शनिवारवाडा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतील संरक्षित वास्तू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी रात्री तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात महिलांविरुद्ध धार्मिक भावना भडकविण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघाले. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणात तीव्र भूमिका घेतली. पतीत पावन संघटनेसह त्या शनिवारवाड्याच्या आवारात पोहोचल्या. परिसरात गोमूत्र शिंपडण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी या हालचालींना प्रतिबंध केला, त्यामुळे मेधा कुलकर्णी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. ज्या ठिकाणी नमाज पठण झाले, तिथे आम्हाला शुद्धीकरण करायचे आहे, असे मत मेधा कुलकर्णी यांनी मांडले. पोलिसांनी मात्र त्यांना वास्तूमध्ये प्रवेश नाकारला.
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही. तो मराठा साम्राज्याचा वारसा आहे. पुणे हे सर्व धर्मीयांचे शहर आहे. मेधा कुलकर्णी जाणूनबुजून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, ‘कोथरुडमध्ये नाटकं करून झालं, आता कसब्यातून येऊन हिंदू-मुस्लिम ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खासदार ताईंवर तातडीने गुन्हा दाखल करावा. प्रार्थना असो की दुवा हेतू एकच असतो, पण त्या जाणूनबुजून समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत.’ शनिवारवाड्यातील सामूहिक प्रार्थनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरू झालेला वाद आता धार्मिक आणि राजकीय स्वरूप धारण करत आहे. पोलिसांचा तपास पुढील काही दिवसांत कोणत्या दिशेने जातो याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


