पुणे : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक मिळावे, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू असताना राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) ९९ टक्के पुस्तकांच्या वितरणाचे काम पूर्ण झाले आहे. बालभारतीने मागणीनुसार यंदा ५ कोटी ७० लाख पुस्तकांची छपाई केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीने यंदा ५ कोटी ७० लाख पुस्तकांची छपाई केली. तसेच शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार मे अखेरीस पुस्तकांच्या वितरणाचे काम पूर्ण करण्यात आले. बालभारतीच्या राज्यातील विविध पुस्तक भांडार मार्फत वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यंदा प्रथमच इयत्ता पहिलीच्या वर्गाला नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पहिलीच्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती नवीन शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आली.
अतिशय कमी कालावधीत बालभारतीने पहिलीच्या पुस्तकांची छपाई पूर्ण करून ती वेळेत वितरित करण्याचे काम केले. तसेच राज्य शासनाने पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयात बदल केल्याने बालभारतीला पुन्हा जुन्या रचनेनुसार पुस्तकांची छपाई करावी लागली. पावसामुळे पुस्तकांची वाहतूक करताना काही भागांत अडथळे निर्माण झाले. दुर्गम भागात थोड्या फार प्रमाणात समस्या येत होत्या. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र वितरण झाले आहे.
बालभारतीकडून ९९ टक्के पुस्तकांचे वितरण
राज्यातील विदर्भ वगळता येत्या १६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत बालभारतीकडून ९९ टक्के पुस्तकांचे वितरण झाले आहे. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र पुस्तके पोहोचली आहेत. यंदा मागणीनुसार ५ कोटी ७० लाख पुस्तकांची छपाई करण्यात आली. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिलीचे पुस्तक एनईपी नुसार उपलब्ध करून दिले आहे. तसेच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर पूर्वीसारखी पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळतील याची खात्री आहे.
– कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती


