नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हौज काझी परिसरात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. 65 वर्षीय महिलेवर तिच्याच 39 वर्षीय मुलाने दोनवेळा बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या नराधम मुलाने आईला चरित्रहीन ठरवत वडिलांना घटस्फोटासाठी दबाव टाकला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या 72 वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचारी पतीसह, तिच्या 25 वर्षीय मुली आणि आरोपी मुलासह हौज काझी परिसरात राहते. याच परिसरात त्यांची मोठी विवाहित मुलगीही आपल्या सासरच्यांसह राहते. 17 जुलै 2025 रोजी पीडित महिला, तिचे पती आणि लहान मुलगी सौदी अरेबियातील धार्मिक यात्रेसाठी गेले होते. या काळात आरोपी मुलाने आपल्या वडिलांना वारंवार फोन करून आईवर अनैतिक संबंधांचा आरोप लावला आणि त्यांना तातडीने दिल्लीला परत येऊन घटस्फोट देण्यास सांगितले.
1 ऑगस्ट 2025 रोजी कुटुंब परतल्यानंतर, आरोपीने आईला मारहाण केली आणि तिचा बुरखा जबरदस्तीने काढला. तिला खोलीत बंद करून त्याने शारीरिक छळ केला. या घटनेमुळे घाबरलेली महिला आपल्या मोठ्या मुलीच्या सासरी निघून गेली. 11 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता ती घरी परतली असता, आरोपीने पुन्हा तिला एकट्याने बोलण्याच्या बहाण्याने खोलीत नेले, चाकू आणि कात्रीने धमकावले आणि बलात्कार केला. त्याने याला तिच्या कथित “जुन्या अनैतिक संबंधांची शिक्षा” असल्याचे सांगितले. 14 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 वाजता त्याने पुन्हा असाच अत्याचार केला.
या भयंकर अनुभवानंतर पीडित महिलेने लज्जेने आणि भीतीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. ती आपल्या लहान मुलीच्या खोलीत झोपू लागली. मात्र, दुसऱ्या अत्याचारानंतर तिने आपल्या 25 वर्षीय मुलीला ही आपबिती सांगितली. मुलीने तिला धीर देत पोलिसांत तक्रार देण्यास प्रोत्साहित केले. 15 ऑगस्ट रोजी पीडित महिलेने आपल्या मुलीसह हौज काझी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सध्या पुढील तपास सुरू आहे.


