Religious Conversion Racket: एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत तरुणींचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ तरुणच नव्हे, तर कंपनीतील काही महिला कर्मचाऱ्यांनीही हिंदू तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘मास्टरमाईंड’ची भूमिका निभावल्याची चक्रावणारी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकारामुळे नाशिकसह संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, यामागे एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
असा रचला जायचा ‘साखळी’ कट
आरोपींनी तरुणींचे ब्रेनवॉश करण्यासाठी अत्यंत पद्धतशीर मार्ग निवडला होता. कटात सामील असलेल्या दोन तरुणी इतर हिंदू मुलींशी जवळीक साधून, “तुला हा विशिष्ट धार्मिक पोषाख खूप छान दिसेल,” असे सांगून त्यांना हळूहळू विशिष्ट धर्माकडे वळवण्याचे काम करत. यातील मुख्य संशयित दानिश हा विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. एका पीडितेवर रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा गंभीर प्रकारही तपासादरम्यान समोर आला आहे.
पीडितेच्या जीवनशैलीत झालेला अनाकलनीय बदल
या प्रकरणातील मुख्य पीडितेवर संशयितांचा इतका पगडा होता की, तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली होती. पीडितेने सलग 2 वर्षे महिना-महिनाभर उपवास धरण्यास सुरुवात केली होती. तिने तिच्या हिंदू मैत्रिणींपासून दुरावा निर्माण केला होता आणि हिंदू सहकाऱ्यांसोबत जेवणेही बंद केले होते. इतकेच नव्हे, तर गेल्या 1 वर्षापासून तिने ओठांना लिपस्टिक लावणेही बंद केले होते. तिच्या टीम लीडरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणाचेही ऐकले नाही.
SIT कडून कठोर कारवाई; 9 गुन्हे दाखल
नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने कठोर पावले उचलली आहेत. देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. विशेष तपास पथकाने (SIT) कंपनीची एचआर (HR) आश्विनी चैनानी हिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली आहे. सध्या तिला नोटीस देऊन सोडण्यात आले असून, लग्नाचे आमिष दाखवून शोषण करणाऱ्या विवाहित दानिशच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस वेगाने तपास करत आहेत.


