Gautami Patil: पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झाला होता. 30 सप्टेंबरला एका हॉटेल समोर हा अपघात झाला होता. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. अपघातावेळी रिक्षात दोन प्रवासी असल्याचेही सांगितले जात आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलवर अनेक आरोपही केले होते. आता गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघातापूर्वी सीसीटिव्ही समोर आला आहे. अपघातपूर्वी वाहनातून 2 व्यक्ती खाली उतरल्याचे व्हिडिओ मधून समोर आले आहेत. चालकाच्या शेजारील आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती अपघात स्थळापासून आधीच खाली उतरल्याचे स्पष्ट झालंय.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये भोरवरून मुंबईच्या दिशेने एका पेट्रोल पंपाजवळ गौतमीचे वाहन उभे केल्याचे दिसून येते. या रिक्षाचालकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोज किमान 70 ते 80 हजार रुपये खर्च होत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता पर्यंत किमान 5 लाख रुपये खर्च झाल्याचा दावा आहे आणि अजून खर्च होणार असल्याच कुटुंबीयांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री सहायता निधी आणि बाकी योजनांसाठी कुटुंबीयांनी कागदपत्र दिले आहेत.
अपघातातील जखमी रिक्षाचालक मगराळे याच्या कुटुंबीयांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात तपासाला वेग दिला आहे. तपासात गाडी कुठून आली होती त्याचा तपास केला जाईल. सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत.सगळा तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.


