Nepal Rain: नेपाळमध्ये शनिवारीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. 51 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नेपाळच्या पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोशी प्रांतातील इल्लम जिल्ह्यात गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 37 जणांचा मृत्यू झाला. तर इतर मृत्यू पावसामुळे रस्ते दुर्घटना, पूरस्थिती, वीज कोसळून, पाण्यात वाहून जाणे अशा घटनांमध्ये झाले आहेत. शेकडो जण बेपत्ता झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त
नेपाळमधील या आपत्तीसंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून शोक व्यक्त केले, “नेपाळमधील मुसळधार पावसामुळे झालेली जीवित आणि वित्तहानी अत्यंत दुखद आहे. या संकटात भारत नेपाळी नागरिकांसह आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. मित्रराष्ट्र आणि तात्काळ मदत पुरवणारा शेजारी म्हणून भारत कोणत्याही आवश्यक सहाय्यासाठी पूर्णपणे तयार आहे.” असे मोदींनी म्हटले.
भारताने यापूर्वी 2015 च्या भूकंपात (8,962 मृत्यू, 21,952 जखमी) आणि 2020 च्या पूर संकटात (196 मृत्यू, 188 जखमी) नेपाळला महत्त्वपूर्ण मदत केली होती. सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय संबंधांमुळे दोन्ही देश संकटकाळात एकमेकांना मदत करत असतात.


