Sambhajinagar Crime: शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका हॉटेलमध्ये चुकून दुसऱ्या खोलीत गेलेल्या ३० वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे नेमंक प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. ती आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी संबंधित हॉटेलमध्ये गेली होती आणि रूम नंबर १०५ मध्ये थांबली होती. रात्री उशिरा फोनवर बोलण्यासाठी ती खोलीबाहेर आली. मात्र, परत जाताना तिची गल्लत झाली आणि ती १०५ ऐवजी चुकून रूम नंबर २०५ मध्ये शिरली.
अत्याचाराचा थरार
रूम नंबर २०५ मध्ये आधीच तीन तरुण मद्यप्राशन करत बसले होते. आपली चूक लक्षात येताच तरुणी बाहेर पडू लागली, मात्र आरोपींनी तिला बळजबरीने पुन्हा खोलीत ओढले. आरोपींनी पीडितेवर जबरदस्ती करत तिला बिअर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे २ ते ४ च्या दरम्यान तरुणीने कसाबसा त्यांच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवला आणि थेट पोलीस ठाणे गाठले.
हेही वाचा – Sangli Crime: सांगली हादरली! ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; दोन आरोपींना अटक
आरोपींना अटक
पीडितेच्या तक्रारीनंतर वेदांतनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, ज्यात हा सर्व प्रकार कैद झाला होता. आरोपींनी रूम बुक करताना दिलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड या तिघांना अटक केली.
कोण आहेत आरोपी?
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे एका फायनान्स कंपनीत रिकव्हरी एजंट म्हणून काम करतात. त्यांनी बुधवारी रात्री मद्यप्राशन करण्यासाठी हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती. तपास अधिकारी प्रवीण यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


