Pune Crime: विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून (Matrimony Site) ओळख करून एका भामट्याने तरुणीला तब्बल २१ लाख रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आरोपीने केवळ खऱ्या नोटा उकळल्याच नाहीत, तर पैसे परत करण्याच्या बहाण्याने तरुणीच्या हातात ५० लाख रुपयांच्या ‘नकली नोटा’ देऊन तिची क्रूर थट्टाही केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली ओळख आणि फसवणूक
रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गोरख गवंडकर नावाच्या आरोपीने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर आपली बनावट माहिती भरली होती. त्याद्वारे त्याची ओळख एका पुणेकर तरुणीशी झाली. “तुझ्याशीच लग्न करायचे आहे” असे भासवून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे स्वप्न दाखवले. त्यानंतर, ‘सध्या मोठी आर्थिक अडचण आहे’ असे भावनिक कारण सांगून त्याने वेळोवेळी तरुणीकडून तब्बल २१ लाख रुपये उकळले.
नकली नोटा देऊन लावला ‘चुना’
पैसे परत करण्यासाठी गोरखने तरुणीला सिंहगड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे त्याने ५० लाख रुपयांनी भरलेली एक बॅग तरुणीकडे सोपवली आणि “यातून तुझे २१ लाख रुपये काढून घे” असे सांगून तो तिथून तातडीने सटकला. तरुणीने घरी जाऊन बॅग उघडली तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. त्या बॅगेत खऱ्या नोटा नसून लहान मुलांच्या खेळण्यातील आणि ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ छापलेल्या नकली नोटा होत्या.
पोलीस कारवाई आणि इशारा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. सिंहगड रोड पोलीस आरोपीचा शोध घेत असून, त्याला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. विवाह संकेतस्थळांवर ओळख झालेल्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. लग्नापूर्वी आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खात्री करा, अन्यथा अशा भामट्यांचे तुम्हीही शिकार होऊ शकता. आरोपीने अशाच पद्धतीने इतरही काही मुलींना फसवले आहे का, याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत.


