Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जंगलात एकाच दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जंगलात आढळले मृतदेह
राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत असलेल्या घनदाट जंगलात ही घटना घडली. शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे दोघेही एकाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. एका शेतकऱ्याने हा प्रकार पाहिल्यानंतर पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या साधारण चार दिवसांपूर्वी घडली असावी. मृतदेहांची अवस्था पाहता परिसरात दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा – Kolhapur Crime: ‘तुला मुलं होत नाही…’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन
आत्महत्या केलेला ओंकार बरगे हा गावात अत्यंत मनमिळाऊ आणि कष्टाळू तरुण म्हणून ओळखला जात होता. बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा स्वतःचा ट्रॅक्टर तो चालवत असे. इतकेच नव्हे तर, गावातील यात्रेत १०० किलोची गुंडी लीलया उचलणारा शरीरसौष्ठवप्रेमी तरुण म्हणून त्याची ख्याती होती. अशा धडधाकट आणि मेहनती तरुणाने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने शेळेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


