Kolhapur Crime: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरलेलाच असताना, आता शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातून आणखी एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात एका वडिलांनीच आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या अमानवी कृतीने बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे.
गणपती उत्सवाच्या काळात घडला होता पहिला प्रकार
प्राप्त माहितीनुसार, गणपती उत्सवाच्या काळातच आरोपी वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार केला होता. मुलीने तो प्रसंग सहन केला, मात्र दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या नराधमाने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
आईच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला प्रकार
मुलीच्या आईने आरोपीचे कृत्य पाहिले आणि तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून करवीर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी वडिलांना अटक केली. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. या अमानवी घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.


