Nanded: नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आणि पक्षप्रवेश सोहळ्यात अनपेक्षित गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला. अजित पवार यांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी कधी करणार? अशा घोषणा सभास्थळी घुमू लागल्या. त्यामुळे अजित पवार यांना भाषण थांबवून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले, ‘मी कर्जमाफी होणार नाही, असं कधीच म्हटलं नाही.’
दोन शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
घोषणाबाजी सुरूच राहिल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली आणि सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या कार्यक्रमात शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड हजार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी अजित पवार उपस्थित होते आणि नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
पावसामुळे भाषण अर्धवट
दरम्यान, भाषण सुरू असतानाच अचानक पाऊस सुरू झाल्याने लोकांनी डोक्यावर खुर्च्या धरल्या आणि काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अजित पवार यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. अजित पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी, सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. अप्पर पैनगंगा कालव्याचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच त्यांनी सांगितले की तरुण शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दत्ता भरणेंच्या सभेतही गोंधळ
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यक्रमातही शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण कर्जमाफी करा’ आणि ‘अतिवृष्टीचे अनुदान द्या’ अशा मागण्या करत गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करत काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. सरकारने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे अनुदान देऊ असे आश्वासन दिले असले, तरी त्याची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.


