नाशिक : सैय्यद पिंप्री येथे टेहळणी करून बंद घर फोडणारा सराईत चोरटा ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यास पुण्यातील खडकी भागात बेड्या ठोकल्या असून, त्याच्या ताब्यातून चोरीचा सुमारे ४ लाख ६९ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशकुमार देविदास तायडे (वय ४३, मूळ रा.जामनेर रोड, भुसावळ हल्ली रेंजहिल खडकी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सैय्यद पिंप्री (ता. जि. नाशिक) येथील धनंजय झोमान यांचे घर गेल्या शुक्रवारी (दि.४) फोडण्यात आले. या घटनेत अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ५५ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा माग काढताना त्याच्या चोरी करण्याच्या पध्दतीवरून तांत्रिक विश्लेषण केले. त्या आधारे संशयित तायडे याने चोरी केल्याचा अंदाज पथकाला आल्याने पथकाने पुणे गाठून संशयितास बेड्या ठोकून कसून चौकशी केली. यात त्याने दुचाकीवर सैय्यद पिंप्री गाठून रेकी करीत घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस तपासात संशयिताविरोधात पुणे जिल्ह्यातील खडकी पोलीस ठाणे हद्दीत खून व शस्त्र कायद्यान्वये तसेच नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीतही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या ताब्यातून चोरी केलेले ३६ ग्रॅम वजनाचे सोने चांदीचे दागिणे, दुचाकी हेल्मेट व मोबाइल असा सुमारे ४ लाख ६८ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, संशयिताच्या अटकेने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.


