Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. शेळगाव गावात केवळ किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने तरुणाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री ग्रामपंचायत परिसरात ही घटना घडली. संतोष माटलवार हा तरुण आपल्या भावासोबत व मित्रांसोबत बसून गप्पा मारत होता.
दरम्यान, गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा तिथे आला आणि संतोषला ‘तू माझ्या बहिणीच्या मागे लागू नकोस,’ अशी धमकी दिली. संतोषने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद चिघळत गेला. त्याच रागातून अल्पवयीन मुलाने हातातील धारदार चाकूने संतोषच्या गळ्यावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
हेही वाचा – Double Murder : बुलढाण्यात पोटच्या गोळ्याने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; जमिनीच्या वादाने कुटुंबाचा बळी
कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला ही घटना किरकोळ भांडणातून झाल्याचे समजले होते. मात्र, मयत संतोषच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हत्येमागे बहिणीच्या छेडछाडीचा वाद असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला. अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.


