Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, नाशिकच्या सातपूर परिसरातून आणखी एक धक्कादायक ‘सेक्स स्कँडल’ समोर आले आहे. एका व्यावसायिकाच्या हार्ड डिस्कमधील १०० हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
हार्ड डिस्कची चोरी अन् ब्लॅकमेलिंगचा सापळा
सातपूर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने आपली हार्ड डिस्क चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक वास्तव समोर आले. तक्रारदाराच्या ऑफिसमध्ये पूर्वी कामाला असलेल्या व्यक्तीनेच ही हार्ड डिस्क चोरली होती. या हार्ड डिस्कमध्ये 2003 ते 2024 या कालावधीतील तब्बल 100 हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी सुरुवातीला 10,000 रुपये घेतले, मात्र नंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची मागणी केली.
कोण आहे हा ‘व्यावसायिक’?
स्वतःला पत्रकार सांगणारा हा व्यक्ती महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे (Consultant) काम करत असे. विशेष म्हणजे, तो अर्धवेळ ज्योतिष पाहण्याचेही काम करायचा. याच कामाच्या नावाखाली त्याने महिलांशी जवळीक साधून त्यांचे चित्रीकरण केले असावे, असा संशय पोलिसांना आहे.
अंनिसचे पीडित महिलांना आवाहन
या प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. “कोणी ज्योतिषाच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करत असेल, तर पीडितांनी न घाबरता पुढे यावे,” असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे. पीडित महिलांच्या पाठीशी समिती खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांची भूमिका आणि ‘खरात पॅटर्न’
सातपूर पोलिसांनी आरोपींकडून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त केले आहेत. तक्रार देण्यासाठी पुढे येणाऱ्या महिलांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाही पोलीस प्रशासनाने दिली आहे. जर पीडित महिलांनी तक्रार दिली, तर संबंधित व्यावसायिकावरही कठोर कारवाई केली जाईल. भोंदू अशोक खरात प्रकरणाशी साधर्म्य असल्याने सोशल मीडियावर या घटनेला ‘खरात पॅटर्न 2’ म्हटले जात आहे. ज्या प्रकारे खरातने श्रद्धेच्या नावाखाली शोषण केले, त्याचप्रमाणे या व्यावसायिकानेही कन्सल्टन्सी आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये जोरात आहे.


