Pune Crime : घरगुती वादाचे पर्यवसान एका भीषण दुर्घटनेत झाले असून, मंचर परिसरात एका मातेने आपल्या पोटच्या मुलांसह टोकाचे पाऊल उचलले आहे. मुलासह विहिरीत उडी घेतल्याने ६ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर त्यापूर्वी आपल्या १४ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मंचर उपजिल्हा रुग्णालयाजवळ राहणाऱ्या हर्षदा आशिष बाणखेले (वय 35) यांनी कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी आपला 6 वर्षांचा मुलगा नेहाल याला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. विहिरीत पडल्याचा आवाज येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने नेहालचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. हर्षदा यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घरात मुलगी आढळली बेशुद्ध अवस्थेत
विहिरीच्या घटनेनंतर पती आशिष बाणखेले यांनी आपली 14 वर्षांची मुलगी परिज्ञा हिच्याबाबत विचारणा केली असता, हर्षदा यांनी सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, संशय आल्याने घर उघडले असता परिज्ञा गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर जखमांच्या खुणा असल्याने, विहिरीत उडी घेण्यापूर्वी आईने तिचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. परिज्ञावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
वादाचे रुपांतर भीषण शोकांतिकेत
मिळालेल्या माहितीनुसार, बाणखेले कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. याच मानसिक तणावातून हर्षदा यांनी स्वतःसह मुलांचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात संताप आणि दुःख व्यक्त केले जात आहे. किरकोळ वादातून इतके टोकाचे पाऊल का उचलले गेले? यामागे आणखी काही कारण आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.


