Pune News: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडींचा थेट फटका आता पुणेकरांच्या खिशाला बसू लागला आहे. आधीच पेट्रोल आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून हे नवे दर 3 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
पुण्यात कुठे-कुठे झालीय सीएनजी दरवाढ?
प्रामुख्याने Torrent आणि MNGL या दोन कंपन्या सीएनजीचा पुरवठा करतात. एमजीएल कंपनी शहरी भागात तर टोरेंट कंपनी ग्रामीण भागात पुरवठा करते. एमएनजीएलच्या दरात कोणतीही वाढ झाली नसून टोरेंट कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ केलीय. ग्रामीण भागात दोन रुपयांनी सीएनजी महागला.
पुण्यातील सीएनजीचे काय आहेत नवे दर?
या दरवाढीपूर्वी पुण्यामध्ये सीएनजीचा दर 92.50 रुपये प्रति किलो इतका होता. पण ताज्या दरवाढीनंतर आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 94.50 रुपये मोजावे लागणार आहेत. अचानक झालेल्या या वाढीमुळे रिक्षाचालक, टॅक्सी चालक आणि सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहन मालकांसह सर्वसामान्यांचंही बजेट कोलमडणार आहे.
दरवाढीचे मुख्य कारण
माहितीनुसार या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे प्रामुख्याने कारणीभूत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाल्याने नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाली असून त्याचे पडसाद स्थानिक बाजारपेठेत उमटताना दिसत आहेत.


