Ashok Kharat Case: महिलांचे शोषण आणि कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांनी हादरलेल्या नाशिकमध्ये, भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. न्यायालयाने खरातच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली असून, आता त्याला २० एप्रिलपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे. ही त्याची सलग तिसरी न्यायालयीन कोठडी असून, तपास यंत्रणांनी त्याच्याभोवतीचा फास आता अधिक आवळला आहे.
न्यायालयाचा निर्णय आणि तपासाचा वेग
अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासातील प्रगती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातवर नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल होत असल्याने त्याचे गुन्हेगारी साम्राज्य किती खोलवर पसरले आहे, याचा उलगडा आता होऊ लागला आहे.
SIT ॲक्शन मोडमध्ये: चौथ्या गुन्ह्याची टांगती तलवार
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी नियुक्त केलेले विशेष तपास पथक (SIT) आता अत्यंत आक्रमक झाले आहे. खरातविरुद्ध दाखल झालेल्या चौथ्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी SIT ने न्यायालयाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या नवीन गुन्ह्यातील गुपिते उघड करण्यासाठी खरातला पुन्हा ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करणे आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आर्थिक व्यवहारांचे फुटणार गुपित?
अशोक खरातने केवळ नाशिकच नव्हे, तर अनेक शहरांमध्ये फसवणुकीचे जाळे विणल्याचा संशय आहे. विशेषतः समता पतसंस्थेतील संशयास्पद खाती आणि त्यातून झालेली कोट्यवधींची अवैध उलाढाल हा तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असला, तरी SIT च्या नव्या कोठडीच्या मागणीमुळे या प्रकरणात काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


