Akola Crime: पुण्यातील धक्कादायक घटनांची शाई वाळते न वाळते तोच, अकोला जिल्ह्यातून माणुसकीला लज्जित करणारी बातमी समोर आली आहे. पातुर तालुक्यातील एका गावात ६० वर्षांच्या वृद्धाने शेजारी राहणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर सलग ४-५ दिवस अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आई-वडील शेतात, अन् नराधम घरात…
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेचे आई-वडील शेतमजूर असून उदरनिर्वाहासाठी ते रोज सकाळी घराबाहेर पडतात. घरी कोणीही नसल्याची संधी साधून ६० वर्षीय आरोपीने या निरागस मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनवले. भीतीच्या छायेखाली असलेल्या या मुलीने गेल्या काही दिवसांपासून हा छळ सोसला. अखेर काल तिने धीर एकवटून आई-वडिलांना आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पोलीस कारवाई आणि पथके रवाना
घटनेचे गांभीर्य ओळखून चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्याची कुणकुण लागताच आरोपीने गावातून पळ काढला आहे. या नराधमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ३ विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. राज्यातील या घटनांनी वृद्धांमधील वाढती विकृती आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जनसामान्यातून जोर धरत आहे.


