Gauri Garje Death Case: पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे यांना त्यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर, आज कोर्टात झालेल्या सुनावणीत मोठी घडामोड समोर आली आहे. न्यायालयाने अनंत गर्जे यांच्या पोलीस कोठडीची मुदत 2 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. वरळीतील राहत्या घरी गौरी गर्जे यांनी गळफास घेतल्याची घटना घडली होती. मात्र, कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पोलिसांचे कोर्टात मोठे दावे
अनंत गर्जे यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले की अनंत आणि गौरी दोघांच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत, त्यामुळे या जखमा कशा आणि कोणत्या परिस्थितीत झाल्या, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासासाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पोलीसांनी कोर्टात पुढे म्हटले की, घटनास्थळाशी संबंधित मोबाईल रेकॉर्डिंग मिळाले आहेत, त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. CCTV फुटेजही तपासली जात आहे. पंचनामा अहवालातही गौरीच्या शरीरावर काही जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांच्या अनुषंगाने अधिक चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – गौरी पालवे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! गौरीच्या वडिलांकडून ‘या’ दोन व्यक्तींच्या अटकेची मागणी
अनंत गर्जे यांच्या बाजूने बचाव
कोर्टात अनंत गर्जे यांच्या वकिलांनी दावा केला की, अनंत गर्जे यांनी घटनेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी स्वतःहून पोलिसांसमोर हजेरी लावली. ते तपासात कोणतीही अडथळा आणत नाहीत. अनंत गर्जे यांचे वकील मंगेश देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये गौरीच्या शरीरावर जखमा आहेत असे कुठेही नमूद नाही.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या काही मिनिटे आधी अनंत आणि गौरी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अनंत कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडला. कोस्टल रोडवर पोहोचल्यानंतर अनंतने गौरीला अनेक वेळा फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. शंका आल्याने अनंत लगेच परत घरी आला. दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून आत पाहिले. तेव्हा त्याला गौरीने गळफास घेतल्याचे दिसले. या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, तपासातून आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.


