पन्हाळा : कोल्हापुरातील सी.पी.आर. हॉस्पिटलमधील भेटीवेळी झालेल्या ओळखीचा फायदा घेत तेजस चिमाजी पठाणे (रा. भादोले, ता. हातकणंगले) यांना पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथील उदय वसंत शिंदे याने नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद पठाणे यांनी पन्हाळा पोलिसांत दिली. फिर्यादीवरून उदय शिंदे याच्यावर पन्हाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
यातील संशयित आरोपी उदय शिंदे व फिर्यादी पठाणे यांची कोल्हापुरातील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. या भेटीतून झालेल्या ओळखीचा फायदा घेत शिंदे याने आपण शासकीय मजूर ठेकेदार असल्याचे फिर्यादीस भासवले. आपल्या खूप ओळखी असून, मी तुम्हाला सरकारी नोकरी लावतो, असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी पठाणे यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली.
पठाणे यांच्याकडे वारंवार पैसे देण्यासाठी तगादा लावू लागला. शिंदे याच्या सततच्या पाठपुराव्याने फिर्यादी यांनी १ जानेवारी २०२५ पासून ऑनलाईन व रोख स्वरूपात शिंदे याला ९ लाख ४८ हजार रुपये दिले. पैसे देऊनही नोकरी लागत नाही, हे पाहून फिर्यादीने पाठपुरावा चालू केला; पण आरोपीने फिर्यादींना भेटणे व त्यांचा फोन उचलणे टाळू लागला. यावरून फिर्यादी यांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे फिर्यादी सातार्डे येथील आरोपीच्या घरी गेले व दिलेल्या पैसे परत मागितले. आरोपीने त्यांना धमकी दिली. पन्हाळा पोलिसांत उदय शिंदे याच्यावर गुन्हा नोंद केला असून, रात्री उशिरापर्यंत संशयितास अटक करण्याची प्रक्रिया चालू होती.


