पिंपरी : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री माण येथे घडली. प्रतीक विलास निकम (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष मारुती निकम (वय ५१, रा. माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२१) कैलास गौतम खाडे (वय २९, रा. माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा पुतण्या प्रतीक निकम शुक्रवारी रात्री सव्वा आकाराच्या सुमारास माण येथून दुचाकीवरून जात होता. दरम्यान डीएलएफ सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला असता आरोपी कैलास खाडे यांच्या ताब्यातील भरधाव कारने त्याला धडक दिली. यामध्ये प्रतीक गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


